
मुख्याध्यापिका यांचा संदेश
रोजीरोटी मिळवण्यासाठी भारतभरात मोठ्या प्रमाणावर कामगारांचे, कारागिरांचे स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रात तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोट भरण्यासाठी येत असतात. अशा पालकांच्या मुलांचे शिक्षण हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पालकांचा अशिक्षितपणा, दारिद्र्य, शिक्षणाबद्दलची अनास्था यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत असतोच परंतू भाषिक अडसर हा सुद्धा मोठा अडथळा असतो. अशावेळी या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची भाषा स्वीकारली पाहिजे, भाषेबरोबरच त्यांची संस्कृती, चालीरीती, सणवार याबद्दलही आस्था दाखवली गेली पाहिजे तसेच त्यांची मातृभाषा आणि शिक्षणाचे माध्यम असलेली भाषा यात समन्वय साधला गेला पाहिजे, तरच ही मुले आनंदाने शिकू शकतील आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. हे फार मोठं आव्हान आहे पण मराठी शाळाच ते आव्हान पेलू शकतील याची मला खात्री आहे!
सुजाता पाटील
मुख्याध्यापिका, माध्यमिक विद्यालय, कुरूळ आणि संस्थापक सदस्य,
सृजन विद्याप्रसारक मंडळ,
कुरूळ, ता.अलिबाग. जि- रायगड.
चेअरमन ऍड. प्रसाद शांताराम पाटील यांचे मनोगत

मला महाविद्यालयीन जीवनापासून शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड होती. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने इंग्रजी विषय शिकवण्यासाठी शनिवार, रविवार प्राथमिक शाळेत जादा वर्ग घेण्याची मी सुरूवात केली. माझ्या गावातील काही सहकारी मित्रदेखील या उपक्रमात मला सहकार्य करीत होते.
पुढे १९९२ सालात शिक्षणमहर्षी आदरणीय कै. दादासाहेब लिमये यांनी कुरूळ गावाचा माध्यमिक विद्यालयाच्या ‘मास्टर प्लॅन’ मध्ये समावेश झाल्याची माहिती दिली. सु.ए.सो. संस्थेमार्फत माध्यमिक विद्यालय सुरु करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती कै. दादासाहेबांनी मला केली. मी, सुजाता पाटील या व माझ्या अन्य शिक्षणप्रेमी सहकाऱ्यांच्या मदतीने १५ जून १९९२ रोजी ‘माध्यमिक विद्यालय, कुरुळ’ शाळा सुरु केली. काही दिवस एका शेडमध्ये आठवीचा वर्ग आणि पाचवीचा वर्ग व ऑफिस विठोबा सिताराम पाटील यांच्या घराच्या ओटीवर, अशी शाळेची सुरुवात झाली. पुढे एका छोट्याशा खाजगी चाळीत भाड्याने आणि कालांतराने स्वतंत्र इमारतीत शाळेचे स्थलांतर झाले.
आज ‘सु.ए.सो. माध्यमिक विद्यालय’ आणि ‘सृजन विद्या प्रसारक मंडळा’चे ‘सृजन प्राथमिक विद्यालय’ एका प्रशस्त स्ववतंत्र शैक्षणिक संकुलात सुरु आहे.गावातील आणि परिसरातील गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, सर्व सोयींनी युक्त अशा संकुलात व्हावा, हाच आमचा ध्यास होता व आहे.
हे शैक्षणिक संकुल उभे करत असताना पालकांवर किंवा ग्रामस्थांवर कोणताही आर्थिक बोजा आम्ही पडू दिलेला नाही. शिक्षणप्रेमी हितचिंतकांच्या मदतीने आम्ही स्वत: तन-मन-धनाने हे संकुल उभे केले आहे. गेल्या २६ वर्षांत विविध क्षेत्रातील अनेक नामांकित मान्यवरांनी शाळेस भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.शाळेच्या विविध उपक्रमांची नोंद अनेक समाजसेवी संस्थांनी घेतली आहे. ‘यु-ट्युब’च्या माध्यमातून शाळेचे शैक्षणिक उपक्रम जगाच्या नकाशावर पोहोचले आहेत. आता शाळेची स्वतंत्र वेबसाईट प्रकाशित होत आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे. या खडतर परंतु यशस्वी वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद!
ऍड.प्रसाद शांताराम पाटील
कुरुळ, ता.अलिबाग
आमच्याविषयी
“परिसरातील प्रत्येक मूल शाळेत आले पाहिजे, आनंदाने शिकले पाहिजे आणि या शिक्षणातून समृद्ध जीवन जगण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे” हा विचार मनात ठेवून या शैक्षणिक संकुलाची स्थापना झाली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाचा हक्क नाकारला जावू नये, हा विचार घेवून सुरु झालेली ही शैक्षणिक चळवळ आहे. विविध धर्म, पंथ, भाषा अनुसरणारी मुले इथे शिकतात आणि त्या सर्वांचाच संस्कृतीचा, भाषेचा आदर इथे केला जातो.
१५ जून १९९२ पासून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिक्षणमहर्षी मा.दादासाहेब लिमये (रायगड जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष ) यांच्या प्रेरणेने कुरूळ गावातील शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते एड. प्रसाद पाटील यांनी कुरूळ येथे माध्यमिक विद्यालय सुरु केले. ‘सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली’ यांच्या माध्यमातून गेली सत्तावीस वर्षे हे माध्यमिक विद्यालय कार्यरत आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कुरूळ हे ५वी ते १०वी वर्ग असलेले शासनमान्य अनुदानित विद्यालय आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. वसंतशेठ ओसवाल यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असते.
पालकांच्या विनंतीवरून जून २००४ मध्ये माध्यमिक शाळेला जोडूनच शिशुवर्ग, बालवर्ग व टप्प्याटप्प्याने १ली ते ४थी असा प्राथमिक विभाग सुरु करण्यात आला. प्राथमिक विभाग हा स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शासनमान्यताप्राप्त असून सृजन विद्याप्रसारक मंडळ कुरूळ संस्थेतर्फे या प्राथमिक विभागाचे व्यवस्थापन पाहिले जाते. या प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागात कुरूळ, नवेनगर, वेश्वी, बेलकडे या गावामधील विद्यार्थी शिक्षण घेतात.
शाळेच्या वातावरणात मूल रमले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी व बालककेंद्री असण्याचा आग्रह आम्ही धरतो. ज्ञानरचनावाद, कृतियुक्त अध्ययन, शैक्षणिक साधनांचा विपुल प्रमाणात वापर, विद्यार्थी आणि शिक्षकांमधील स्नेहयुक्त संबंध आणि मैत्रीपूर्ण आंतरक्रिया ही आमची वैशिष्ट्ये आहेत. भारताच्या विविध प्रांतातून आलेले विद्यार्थी आमच्या शैक्षणिक संकुलात शिकतात. वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील आम्ही करत असलेल्या बहुभाषिक शिक्षणासंदर्भातील प्रयोगांची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख आणि वापर याबरोबरच संवेदनशीलता, सौंदर्यदृष्टी, सहजीवन, सामंजस्य याचे संस्कारही या शैक्षणिक वातावरणातून विद्यार्थी स्वीकारतात असा विश्वास आम्हाला आहे.
“ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान” अशी कृती आणि ज्ञान यांची सांगड घालणारी दूरदृष्टी घेवून ही शैक्षणिक चळवळ चालू आहे.




