
बोलफलक
बऱ्याच शाळांमध्ये तळफळे / भिंतीवर रंगवलेले फळे असतातच. बहुतेक वेळा हे फळे कायम स्वरूपी काही माहिती लिहुन, चित्रे काढून रंगवलेले असतात. परंतु या फळ्यांचा उपयोग मुलांच्या मुक्त, स्व अभिव्यक्तीसाठी फार उत्तम पद्धतीने करता येऊ शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या स्व अभिव्यक्ती व सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून शाळेतील वर्गांमध्ये मुलांच्या उंचीनुसार वर्गाच्या चारही भिंतींवर आम्ही या फलकांची निर्मिती केली. ज्या फळ्यांच्या माध्यमातून मुले बोलकी होतात म्हणून त्या फळ्यांना “बोलफलक” असे नाव दिले.
वर्गातल्या या फळ्यांचे खडूने भाग पाडून, प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव एकेका भागावर लिहिलेले असते. “हा बोलफलक म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतः ची जणू फेसबुक वॉलच असते”. विद्यार्थी वर्गात चर्चा करत असलेल्या घटकावर सर्व बाजूंनी विचार करतात आणि त्यानंतर त्या घटकाशी संबंधित, अभिव्यक्त घटकाला अनुसरून चित्र, गोष्टी, कविता, मुलाखतीचे प्रश्न, स्वरचित कविता या माध्यमातून व्यक्त करतात.
शब्दकोश

आमच्या शाळेत बहुभाषिक विद्यार्थी नेहमी मोठ्या संख्येने येतात. त्यांची मातृभाषा व आपली शिकण्याची भाषा ही फार वेगळी असते. अशा बहुभाषिक विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे फार महत्त्वाचे असते.
त्या प्रदेशातील सण, उत्सव, चालीरीती, कुटुंबाविषयी माहिती स्वतः चे अनुभव मुलं एकमेकांना सांगतात. विविध भाषा मुलांना समजाव्यात व संवाद सुकर व्हावा यासाठी आम्ही वर्गातील सर्व मुलांची आवड लक्षात घेता आम्ही विविध भाषांमधील शब्दकोष बनवायचं ठरवलं.
गेल्या दोन वर्षांपूर्वी आम्ही मराठी-भोजपुरी, मराठी-कानडी, मराठी-बंगाली शब्दांचा शब्दकोश तयार केला. शब्दकोश तयार करत असताना खूपच गमती-जमाती झाल्या. हा शब्दकोश तयार करत असताना खूप साऱ्या भाषा मुलांकडून शिकायला मिळाल्या पण प्रत्येक विभागातील भाषा वेगवेगळी असते, हे चर्चेतून उलगडले. यातून संवादाला सुरुवात झाली.
बहुभाषिक वर्ग

रोजीरोटी मिळवण्यासाठी भारतभरात मोठ्या प्रमाणावर कामगारांचे, कारागिरांचे स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रात तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोट भरण्यासाठी येत असतात. अशा पालकांच्या मुलांचे शिक्षण हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पालकांची गरिबी, अशिक्षितपणा, अज्ञान यामुळे या मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत असतोच, परंतु भाषिक अडसर हा त्यांच्या शिकण्यातला फार मोठा अडथळा ठरतो. या मुलांची मातृभाषा (घरात बोलली जाणारी भाषा) ही वेगळी असते.
महाराष्ट्रात शाळेत शिकवण्याचे माध्यम मराठी असते. अशा वेळी या अमराठी भाषिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची भाषा स्विकारली पाहिजे. या उपक्रमासाठी विद्यार्थांनी स्वतः काढलेली चित्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे, नाट्यीकरण, शाळेतील विविध उपक्रम, गोष्टींची पुस्तके, चित्रावचन कार्डे, तक्ते इत्यादी साधनांची गरज असते.
“बहुभाषिक वर्ग” या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आणि शिकण्याबद्दल गोडी निर्माण होते. भाषेच्या भिन्नत्वामुळे सुरुवातीला लाजरे-बुजरे असणारे मूल मनमोकळेपणाने बोलू लागते.
