जगण्याचं प्रतिबिंब
आमच्या शाळेत बहुसंख्य म्हणजे जवळ जवळ ६० टक्के मुलंमुली ही महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर प्रांतातून आली आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड या प्रांताचे मूळ रहिवासी असणारी ही मुलं. मुंबईशी रस्ता आणि समुद्रमार्गे जवळीक, समुद्रकिनारे आणि निसर्ग यामुळे पर्यटकांची गर्दी याकारणांमुळे अलिबाग काहीच्या काही वाढत आहे. त्यामुळे अर्थात शहर आणि आजूबाजूला होणारी प्रचंड बांधकामं त्यामुळे रोजगाराच्या शोधात मुंबईत येणारे हे इतर प्रांतिय खूप मोठ्या प्रमाणावर अलिबाग आणि जवळच्या खेड्यांमध्ये येऊन राहतात. काहींनी तर इथेच छोटी घरे पण बांधली आहेत. आमची शाळा ज्या अलिबागजवळच्या कुरूळ गावात आहे तिथेही मोठ्या प्रमाणावर ही सगळी कारागीर मंडळी राहतात. कुणी कुणी गवंडीकाम करणारे, कुणी लादीकाम, कुणी ‘सेंट्रिंग’ची कामं करणारे, कुणी सुतारकाम करणारे… एकाच्या आधारानी दुसरा इथे येतो, दुसऱ्याच्या ओळखीनी तिसरा….! एकमेकांच्या आधारानी इथे राहतात, इथल्या वातावरणात समरस होतात. इथले सण, रितीरिवाज आणि भाषाही आत्मसात करतात. वर्षातून एकदा – बहुदा मे महिन्याच्या सुट्टीत किंवा लग्नकार्याच्या निमित्तानी वर्षातून एकदा ३-४ दिवसांचे प्रवास करून गावाला जाऊन येतात. हातावर पोट असतं,तरीही प्रत्येकाला किमान ३-४ तरी मुलं असतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच पण मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ही इच्छा मात्र असते. इकडे आल्या की त्या बायका एकमेकींना धरून राहतात, अडीअडचणीला एकमेकींना मदत करतात. पण तेवढ्याच आजूबाजूच्या बायकांशी पण मिळून मिसळून राहतात. इकडच्या वातावरणातला मोकळेपणा, बायकांना मिळणारं बोलण्या, वावरण्याचं स्वातंत्र्य त्यांना जाणवतं आणि आवडतं हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी कळतं. पुरूष दिवसभर कामावर जात असल्यामुळे मुलांना शाळेत आणणं, नेणं, पालकसभेला येणं, फी किंवा इतर काही अडचण असेल तर शाळेत भेटायला येणं हे सगळं या आयाच अतिशय आत्मविश्वासानी करतात. नव्यानी आमच्या गावात आलेल्या त्यांच्या ‘गावाकडच्या’ मंडळीना ‘ये स्कूल बहोत अच्छा है, मॅडम सब संभाल लेगी’ म्हणून आवर्जून शाळेत घेऊन येणाऱ्या २,३ आयांना तर आम्ही शाळेच्या “Brand ambassador” म्हणतो! ही मुलं शाळेत येतात तेव्हा बऱ्याचवेळा त्यांना मराठीचा गंधही नसतो. पण वर्गमित्र- मैत्रिणींच्या सहवासात आणि शिक्षकांच्या प्रयत्नांनी ६-७ महिन्यात ती मराठी बोलायला शिकतात… इतकं चांगलं की मराठीत भांडू शकतात. (गेल्यावर्षी आमच्या शाळेत “पूजा विश्वकर्मा” ही विद्यार्थिनी ८६ टक्के गुण मिळवून पहिली आली होती, आणि तिला मराठीत ८९ गुण होते) तर हे सगळं आज सांगण्याचं कारण असं की शाळेचं स्नेहसंमेलन जवळ आलं आहे. चौथीतली मुलं २,३ दिवसांपासून मागे लागली होती – आम्ही नाटक बसवलंय, ते पाहा. आज मुद्दाम वेळ काढून त्यांच्या वर्गात गेले आणि त्यांनी स्वत: बसवलेलं नाटक पाहून मी थक्क झाले. नाटकाला लिखित संहिता नाही. संवाद, दिग्दर्शन, पात्रयोजना सगळं मुलांनीच केलेलं. नाटकाचं कथानक– एक जण कामाच्या शोधात ‘गावाहून’ आला आहे. इथे त्याला आधीच येऊन इकडे काम करणारे दोघे-तिघे भेटतात. तो त्यांच्याकडे ‘कुठे काम मिळेल का’ अशी चौकशी करतो. हे त्याला एका ठेकेदाराकडे घेऊन जातात. तो त्याला काम देतो. मग या माणसाला विचार पडतो की ‘राहायचं कुठे?’ हे तिघे म्हणतात,”काळजी करू नकोस, आमच्या बरोबर चल, आपण राहायला जागा शोधू” मग ते त्याला ‘रिक्षानी’ गावात घेऊन येतात. (ही रिक्षा पण एकदम खास… हातात हात गुंफून एक जण पुढे ड्रायव्हर आणि मागे प्रवासी! फोटोत ही रिक्षा आहे.) उतरताना रिक्षावाल्याशी भाड्यावरून घासाघीस पण! गावात या नव्या माणसाला राहायला जागा मिळवून देतात. तिथेही ‘भाडं जरा कमी करा.. तो नवीनच आलाय’ वगैरे बार्गेनिंग ! त्या खोलीत त्याचं सामान लावून झाल्यावर आता जेवणाचं काय? “आज तू आमच्याकडे जेवायला ये”. सगळे मिळून मच्छी आणायला गेले. तिथे कोळणीबरोबर पण भावात घासाघीस. एकाला दुकानात पिटाळलं. मच्छी तळायला तेल नी बेसन आणायला. (यांच्याकडे मच्छी बेसन लावून तळतात, हे मला पण आज कळलं ) नंतर सगळे मस्तपैकी जेवले. नवा आलेला माणूस खूष झाला. आणि नाटक संपलं!! हे सगळं नाटक मुलांनी त्यांच्या मातृभाषेत – “भोजपुरी” मध्ये सादर केलं!!!!!!!!!!!! (कोणत्याही उत्तम कलाकृतीमध्ये माणसाच्या खऱ्याखुऱ्या जगण्याचं प्रतिबिंब असतं असं काहीतरी ऐकलं, वाचलं आहे)
भाषांचा पूल बांधताना
“सृजन प्राथमिक विद्यालय” ही आमची स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळा आणि त्याला जोडून असणारे माध्यमिक विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे. अलिबाग जवळ साधारण अडीच – तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘कुरूळ’ गावात आमची शाळा आहे. अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेच, तसंच गेल्या १०-१२ वर्षांपासून बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीनेही अलिबागची झपाट्याने वाढ होते आहे. बांधकाम व्यवसायाशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करणारे कारागीर महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या अनेक भागातून अलिबाग आणि परिसरात स्थलांतरित होत आहेत. कुरूळ गावातही अशा कुटुंबांची संख्या मोठी आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक या भागातून येणाऱ्या कुटुंबांची संख्या फार मोठी आहे. त्या कुटुंबामधली बरीच मुलंमुली आमच्या शाळेत येतात. त्यामुळे आमच्या शाळेत जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थी अमराठी भाषक आहेत. त्यात भोजपुरी आणि हिंदी मातृभाषा असणारी मुलंमुली बरीच जास्त आहेत. सुरुवातीला ही मुलं आमच्या प्राथमिक शाळेत येतात तेव्हा त्यांना मराठीचा गंधही नसतो. आजूबाजूचं वेगळं वातावरण, वेगळी भाषा, वेगळी माणसं यामुळे मुलं अनेकदा बावरलेली असतात. इथे त्यांचं शिकण्याचं माध्यम मराठी असतं, आजूबाजूची संवादभाषा मराठी असते आणि ती भाषा त्यांना अगदी अनोळखी असते. त्यामुळे पहिले काही दिवस, एक- दोन महिने ही मुलं बरीचशी अबोल असतात. आमच्या शिक्षिका या मुलांशी हिंदीत संवाद साधतात. या मुलांना स्वभाषेत, त्यांच्या घरच्या संवादभाषेत बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. सवयीने आमच्या शिक्षिकांना थोडी थोडी भोजपुरी समजते आणि त्यांच्याच वर्गातली किंवा दुसऱ्या वर्गातली मुलं नवीन आलेल्या या मित्र मैत्रिणींसाठी ‘दुभाष्याचं’ काम मोठ्या आनंदानी करतात. शिक्षिका वर्गातल्या प्रत्येक कृतीत त्यांना सहभागी करून घेतात. मुलांची मातृभाषा आणि शिक्षणभाषा असणारी मराठी यात पूल बांधण्यासाठी चित्रवाचनाचा फार चांगला उपयोग होतो. मुलंच एखादं चित्र काढतात आणि त्याला हिंदी, मराठी, भोजपुरी, कानडी, बंगाली यासारख्या भाषांत काय म्हणतात ते सांगतात. शिक्षिका ( देवनागरीत ) ते फळ्यावर लिहितात, पुढे पुढे मुलं वर्गातल्या तळफळ्यांवर (ज्यांना आम्ही ‘ बोलफलक ‘ म्हणतो) स्वत:च हे काम करतात. या सगळ्या प्रक्रियेत खूप मोलाची आणि महत्वाची असते ती वर्गातल्या मुलांची आपापसातली आंतरक्रिया, त्यांचा एकमेकांशी संवाद! वर्गात आधीपासून असलेली अमराठी मुलं नवीन आलेल्या इतर भाषक ( आम्ही कधीच ‘परप्रांतीय’ हा शब्द वापरत नाही ) मुलांसाठी दुभाष्याचं काम अतिशय उत्तम रीतीने करतात. शिक्षिकेला जे म्हणायचंय ते त्या मुली/मुलापर्यंत किंवा त्यांना जे म्हणायचंय ते बाईंपर्यंत पोहोचवण्याचं काम वर्ग मित्रमैत्रिणी अगदी छान पार पाडतात. त्यामुळे ही मुलं मराठी अगदी पटकन आत्मसात करतात. वर्गातल्या गप्पागोष्टींमध्ये, चर्चेत शिक्षिका या मुलांना बोलायला प्रोत्साहन देतात. त्यांच्या मातृभाषेतले शब्द स्वीकाराले जातात. सुरुवातीच्या काळात तर त्यांच्या कोणत्याच बोलण्याला चुकीचं, अशुद्ध ठरवलं जात नाही. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. चर्चा, संवाद, अनुभवलेखन व कथन यासाठी चित्रे, कात्रणे, तक्ते, चित्रवाचन कार्डे, पुस्तके, शाळेतील विविध उपक्रम यांचा कल्पकतेने वापर करून शिक्षिका जाणीवपूर्वक वातावरणनिर्मिती करून नवी भाषा शिकण्याची संधी निर्माण करतात. या वर्षी जून महिन्यात चौथीच्या वर्गात ‘खुशी रैदास’ ही विद्यार्थिनी नवीन आली. तिचे वडील तिला घेऊन आले आणि वर्गशिक्षिकेला सांगून गेले, ” मॅडमजी, हम गाव मे से इसे लेके आये! आप अडमिसन करा दो. इसे मराठी कुछ समझ नही आता! हम भोजपुरी है ! खुशीचा शिकण्याचा प्रवास सांगताना तिची शिक्षिका मानसी सांगते, “खुशीला मी हिंदीतून काही प्रश्न विचारले पण तिने उत्तरं दिली नाहीत, आली तेव्हा ती खूप लाजरी होती, कोणाशी बोलायची नाही. खेळायची नाही. पण चार – पाच दिवसांनी वर्गातल्या समभाषिक मुलींशी तिची मैत्री झाली. मी तिच्याशी बोलू लागले तिला बोलतं केलं. तिच्या भाषेतले शब्द विचारले, मराठी मधले त्याला समानार्थी शब्द सांगितले. असं करत आमचं संभाषण वाढलं. आता तीनचार महिन्यानंतर खुशी मराठी पण बरंच चांगली बोलायला लागलीय. एखादा शिकवलेला भाग समजला नाही तर “बाई, परत शिकवशील? ” असं न लाजता विचारते. तीन – चार वर्षांपूर्वी शाळेत तिसऱ्या इयत्तेत आलेली सुप्रिया सिंग सुरुवातीला मराठी शिकायला, बोलायला अजिबात तयार नव्हती. “मै नही बोलुंगी मराठी, हमरी भाषा हम भूल जावेंगे “! असं ती ठणकावून सांगायची. तिच्या वर्गशिक्षिकेनेही संयम ठेवला. शाळेतही समभाषिक मित्रमैत्रिणींबरोबर ती भोजपुरीतून बोलू शकणार आहेच हा विश्वास दिला. सुप्रिया यावर्षी चौथीत आहे. छान मराठी बोलते. स्वत:ची भाषा अजिबात विसरली नाहीये, उलट भोजपुरीतही सफाईदारपणे लिहिते. मागच्याच महिन्यात तिने तिच्या शिक्षिकांबद्दल लिहिलं होतं – “हमार मॅडम हई मानसी और विनिता. उ हमके बहुत अच्चि बाई हई. उ हमके बोलेली नाही, और हमके पढाएली. उनकर विषय ह – मराठी और विनिता बाईके विषय ह परिसर भाग दू (२). उ हमार सबसे अच्छे बाई हई. उ हमके दुलार देली. और सबसे मोठी बाई के नाव ह सुजाता. उ अमनीके गोवींदा के दिन आवेलातब उ बोलेली की गोविंदा फोडेके देली. और उ सबसे इसकुलके बडी मोठी बाई हइ. और उ दावी (दहावी ) मे पढाएली. उ हमनी के सबसे अच्ची बाइ हई. और उ बोलेली बहुत पढाई करेके. तबेतर बहुत पढाई आई.” शिकण्याची भाषा म्हणून या इतर भाषक मुलांना मराठी तर शिकायला हवीच पण त्यांनी त्यांची मातृभाषा विसरू नये किंवा तिच्याबद्दल त्यांना न्यूनगंड वाटू नये असं आम्हाला मनापासून वाटतं. उलट त्यांना एक भाषा जास्त बोलता, लिहिता येते त्याचा आनंद घेता यावा असा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच ही मुलं जेव्हा अशी स्वत: होऊन त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होतात तेव्हा खरंच मनापासून आनंद वाटतो! पुढच्या इयत्तांमध्ये या इतरभाषक मुलांना मराठी उत्तम बोलता येतं. लेखन सफाईदारपणे, प्रमाण मराठीचे नियम पाळून जमण्यासाठी मात्र बरेच प्रयत्न करावे लागतात, त्यात अजून तरी आम्हाला शंभर टक्के यश मिळालेलं नाही. पण त्यातही काही उदाहरणं अतिशय आशादायक आहेत. तीन वर्षांपूर्वी पूजा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीत ८२ टक्के गुण मिळवले आणि मराठी प्रथम भाषेत तिला ८९ गुण होते. हे एक ठळक अभिमानास्पद उदाहरण! रोजीरोटी मिळवण्यासाठी भारतभरात मोठ्या प्रमाणावर कामगारांचे, कारागिरांचे स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रात तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोट भरण्यासाठी येत असतात. अश्या पालकांच्या मुलांचे शिक्षण हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पालकांचा अशिक्षितपणा, दारिद्र्य, शिक्षणाबद्दलची अनास्था यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत असतोच परंतू भाषिक अडसर हा सुद्धा मोठा अडथळा असतो. अश्यावेळी या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची भाषा स्वीकारली पाहिजे, भाषेबरोबरच त्यांची संस्कृती, चालीरीती, सणवार याबद्दलही आस्था दाखवली गेली पाहिजे त्यांची मातृभाषा आणि शिक्षणाचे माध्यम असलेली भाषा यात समन्वय साधला गेला पाहिजे. तरच ही मुले आनंदाने शिकू शकतील आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. हे फार मोठं आव्हान आहे पण मराठी शाळाच ते आव्हान पेलू शकतील याची मला खात्री आहे! म्हणूनच अन्य भाषक विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थाला स्वत:च्या भाषेत बोलण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. हीच भाषा बोलणारी यापूर्वीची जी मुले असतात त्यांचाशी परस्पर संवाद साधण्याची संधी दिली जाते. त्यांच्या अनुभव विश्वाशी निगडीत चित्र काढून चर्चा घडवली पाहिजे. हि चर्चा होत असताना शिक्षकाने दोन्ही -तिन्ही भाषांमधले समानार्थी शब्द वापरले पाहिजेत. त्या विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतील शब्द स्वीकारून मराठी भाषेतील पर्यायी शब्द त्यांना सांगितले पाहिजेत. या संवादासाठी विविध वस्तू, भरपूर चित्र आणि वर्गात जाणीव पूर्वक निर्माण केलेल्या शिकण्याच्या संधी अत्यंत गरज आहे. ह्या सर्व प्रक्रियेत कुठेही मूल अशुद्ध चुकीचे बोलते आहे असे म्हटले जाऊ नये. “मुलांच्या भाषेचा स्वीकार करणे आणि संवादाला प्रोत्साहन देणे” हि या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. “बहुभाषिक वर्ग”या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आणि शिकण्याबद्दल गोडी निर्माण होते. भाषेच्या भिन्नत्वामुळे सुरुवातीला लाजरे-बुजरे असणारे मूल मनमोकळेपणाने बोलू लागते. या अन्य भाषक मुलांची शैक्षणिक संपादणूक आतिशय उत्तम असते असे आढळून आले तसेच वर्गातल्या, शाळेतल्या मराठी भाषिक मुलानाही इतर भाषांबद्दल कुतूहल निर्माण होते. मुले इतर भाषा शिकण्यास प्रवृत्त होतात आपल्या भाषा भगिनींबद्दल विद्यार्थांच्या मनात आदर निर्माण होतो. इतर भाषिक अन्य प्रांतीय यांच्या बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात दुजाभाव राहत नाही. एकतेची भावना निर्माण होते. या उपक्रमासाठी विद्यार्थांनी स्वतः काढलेली चित्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे, नाट्यीकरण, शाळेतील विविध उपक्रम, गोष्टींची पुस्तके, चित्रावचन कार्डे, तक्ते इत्यादी साधनांची गरज असते. तसेच शाळेत व परिसरात उपलब्ध असलेल्या साधनांचा शिक्षकाने कल्पकतेने वापर केल्यास या उपक्रमासाठी वेगळा कोणताही खर्च करावा लागत नाही.
शाळेचा पहिला दिवस
जून महिन्यात शाळा सुरू झाली की सगळ्या शाळेला उत्सुकता असते ती बालवर्गात नवीन प्रवेश घेऊन येणाऱ्या चिमुरड्यांची. नवी खेळणी, पुस्तकं, रंगीत खडू, फाडकामासाठी कागद, बालवर्गाच्या बाईंनी बोलफलकावर काढलेली चित्रं, वर्गात लावलेले फुगे, चॉकलेटं या साऱ्यासह सगळी शाळा या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी सज्ज असते. बहुतेक मंडळी प्रवेशाच्या वेळी आईचं बोट धरून एकदा शाळेत येऊन गेलेली असतात. तर काहीजण त्याच दिवशी पहिल्यांदा शाळेत येतात. नवा गणवेश, नवं दप्तर ( ते हवंच असतं, सुरूवातीला त्यात फक्त डबा आणि एखादी पाटी, वही असते. मग हळूहळू त्यात ताई / दादाच्या जुन्या वह्या, चित्रांची पुस्तकं, एखादं लहानसं खेळणं, मणी, काचा असं काहीही यायला लागतं. ) प्रत्येक नव्या मेंबरची एंट्री वेगवेगळ्या पध्दतीनी होते. कोणी आईचा हात धरून एकदम ऐटीत येतं आणि जसं काही जन्मल्यापासूनच ही शाळा, वर्ग, बाई ‘आपुनको मालूम है’ अश्या थाटात पहिल्याच दिवशी बिनधास्त बसतात, खेळणी खेळतात, रद्दी पेपर फाडतात, शाळेत पहिल्या दिवशी खास केलेला साखरभात आवडीनी खातात आणि आरामात घरी जातात. काही मंडळी घरून येताना जरा ताशा वाजंत्री लावून येतात पण शाळेत आलं की तिथली गंमत जंमत पाहून थोड्या वेळानी रमतात. काही जण घरून छान नॉर्मल मूडमधे येतात आणि शाळेत आलं की आता आई आपल्याला इथे सोडून जायची शक्यता आहे असं वाटलं की तारस्वरात भोकाड पसरतात. अशा मुलांच्या आयांनाही अनेकदा आठ दहा दिवस बालवर्गात प्रवेश घ्यावा लागतो. त्यातली काही पिल्लं आई डोळ्यासमोर असली की छान खेळतात, वर्गात बागडतात मग हळूहळू रूळतात आणि आई शाळेत सोडून जायला लागली की टाटा करायचा धीर पण येतो त्यांना. काही वीर मात्र आईच्या मांडीवरून उतरायलाच तयार नसतात. वर्गात काय चाललंय, बाकीचे वर्ग बंधूभगिनी काय करतात याचं ते आईच्या मांडीवर बसूनच तटस्थपणे अवलोकन करत असतात. अशा मंडळींच्या आया आठेक दिवस बसून कंटाळतात आणि मग बाईंच्या ताब्यात सोपवून पटकन सटकतात. मग बिचारी चिमुरडी डोळ्यात पाणी, नाकात शेंबूड अश्या अवतारात बाईंच्या मांडीवर बसून ” आई … मम्मी … अम्मी ” असा जप करत शाळा सुटायची वाट पाहात राहतात. पंधराएक दिवसात सगळं स्थिरस्थावर होतं, आणि ही भोकाड पसरणारी चिंटीपिंटीच दादा, ताईगिरी करायला लागतात. इकडे तिकडे धावून बाईंना सतावतात. एकमेकांशी मैत्री होते, भांडणं पण होतात. खेळणी, खडू, फळा, रंगीत खडू सगळं सगळ्यांनी मिळून वापरायचं असतं हे कळायला लागतं. धांगडधिंगा नाचायसाठी बाईंच्या मोबाईल मधे गाणी लावायची फर्मानं निघतात. शाळेतली खिचडी आवडायला लागते. वडाच्या झाडाच्या पारंब्यांवर झोके घेण्यातली, पावसात भिजण्याची, कागदी बोटी करून सोडण्यातली मज्जा कळायला लागते. गाणीगोष्टी पाठ होतात. थोडी थोडी अंक अक्षर व्हायला लागते. बोलफलकावर, फरशीवर स्वत:काढलेली अक्षरं, चित्रं दाखवण्यातला अभिमान तर फार सॉलिड असतो. आणि मग आईबाबा न्यायला आले तरी कधीकधी घरी जायची तयारी नसते. काही मंडळी घरी जायचं नाही म्हणून रडायला लागतात. आजारी असलं तरी शाळेत येणं हवं असतं. प्रेमळ, जीव लावणाऱ्या बाईंकडून हक्कानी हट्ट पुरवून घेतले जातात. घरातली प्रत्येक गोष्ट शाळेपर्यंत पोचते. कोणाकडे पाहुणे आले, आईनी जेवायला काय केलं, नवीन वस्तूची खरेदी, कुठे बाहेर, फिरायला गेलं असेल त्याचा साद्यंत रिपोर्ट मिळत असतो. ३-४ वर्षांच्या या मुलांच्या घरी याच काळात बहुदा दुसरं नवं बाळ येतं . मग ते बाळ काय काय करतं याच्या गोड वर्णनासह बाळ बघायला येण्याचा लाघवी आग्रह पण असतोच. नवा ड्रेस, नवी वही, कानातले, बांगड्या, खेळणं, पुस्तकं हे शाळेत आणून दाखवणं तर जसं काही compulsory च असतं. त्याला नुस्तं छान म्हणून चालत नाही .. ते कोणी, कसं, कधी आणलं याचा साद्यंत वृत्तांत ऐकायला लागतो. काही काही चिमुरडी अजूनही थोडी बोबडी बोलत असतात. त्यामुळे काय सांगतात ते आपल्याला सगळं एका फटक्यात कळणं कठीणच असतं खरंतर, पण लक्षपूर्वक ऐकावं लागतंच! सतत चालणारे, बोलणारे, उड्या मारणारे, कोणत्याही क्षणी आपल्या ध्यानीमनी नसेल असा काहीही उपद्व्याप करणारे, असंख्य प्रश्न विचारणारे २५-३० चिमुकले जीव तीन तास सांभाळणं, तेही अतिशय प्रेमानी ही सोप्पी गोष्ट नसते. आमच्या शाळेतल्या अर्चना कुंटे आणि संध्या थळकर या दोघी सहकारी मैत्रिणी फार मन लावून, झोकून देऊन हे काम करतात. त्यांना वर्गात पाहिलं की लेकुरवाळ्या विठूची आठवण येते मला! मी शाळेच्या कामात कितीही बिझी असले तरी बालवर्गात एक चक्कर मारल्याशिवाय मला करमतच नाही. मी दारातच असते तेव्हाच सगळी फौज धावत येते नी बाई, बाई करत पायाला मिठी मारतात. ग्राउंडवर खेळत असली तरी पळत पळत येणार आणि पायाला मिठी. हात धरून त्यांची चित्रं, खेळ दाखवायला नेतात, कोणी हात ओढत असतं, कोणी पदर, ओढणी ओढत असतं, प्रत्येकाला जवळ घेऊन लाड करायला हवे असतात. त्या वेळचा त्यांच्या डोळ्यातला आनंद खरंच अवर्णनीय असतो. माझ्याही मनातले ताण, चिंता त्या कोवळ्या हातांच्या मिठीत विरघळून जातात. अनेक वेळा मोबाईल मधे त्यांचे, त्यांच्या चित्रांचे फोटो काढायची ऑर्डर दिली जाते. हां, अगदी ओर्डरच असते ती ” फोटो काढा आमचा “! आणि क्लिक झाल्या झाल्या ” दाखवा “!! ( मागे हिंदी मातृभाषा असलेली २-४ मुलंमुली दाखवाच्या ऐवजी ” बगवा” म्हणायची. ते तर फार गोड वाटायचं. ) असं खेळत बागडत वर्षं पटकन संपून जातं. ताईदादांना असते तशी कागदावरची परीक्षा पण हवी असते. मग त्यांच्या बाई काहीतरी गंमतजंमत पेपर काढतात. तो पेपर पण कौतुकानी मिरवला जातो. आणि मग एक मे ला रंगीत प्रगतीपुस्तक पण मिळतं बरं का! वर्षभर जीव लावलेल्या त्या चिमुरड्यांच्या प्रगतीच्या नोंदी वाचणं फार छान असतं. त्यांच्या फुलण्याचा प्रवास असतो तो. माणूस पणाची बीजं त्यांच्यात रूजत असल्याच्या त्या नोंदी असतात. अर्चना आणि संध्या या माझ्या सहकारी मैत्रिणी ते प्रत्येक मूल समजून घेऊन ज्या संवेदनशीलतेनी त्याच्या नोंदी ठेवतात त्याचं मला फार कौतुक वाटतं. ते एकेक नोंदपत्रक म्हणजे प्रत्येक मुलामुलीच्या चिमुकल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. त्यातल्या या काही प्रातिनिधिक नोंदी. त्या वाचून मला वाटलं, प्रत्येक लहान मूल किती निरागस, सहृदय असतं, उत्साही आणि सहकारी वृत्ती जोपासणार असतं. त्यांचीच मोठी माणसं झाल्यावर काय बिनसत असावं बुवा? • सतत काहीतरी लिहिण्याची आवड आहे. सर्वांशी मैत्री करायला आवडते. स्मरणशक्ती चांगली आहे. गोष्टींचे नाट्यीकरण करायला आवडते. • स्वभाव गोड आहे. वर्गातल्या मुलामुलींशी मैत्री करायला आवडतं. शैक्षणिक साहित्याचा वापर छान करते. नाचायला, गोष्ट सांगायला फार आवडतं. • हातापायाचे ठसे काढायला आवडतं. गटकार्यात सहभागी असते. गोष्ट ऐकायला शांत बसते. नेहमी हसत असते. • मनमिळावू स्वभाव आहे. दुसऱ्याला मदत करायला आवडत. नाचायला, उड्या मारायला खूप आवडतं. • सारखं रागवायला आवडतं. स्वभाव हळवा आहे. हट्टीपणा करतो पण भांडणं झालं तरी परत मैत्री करायला जवळ जातो. • स्वभाव बोलका आहे. सर्वांशी मैत्री करते. गाण्यामधे भाग घेते. नवीन शिकण्याची आवड आहे. • गप्पा मारायला फार आवडतात. वस्तू गोळा करायला आवडतं. नाचणे, गाणे, वाजवणे आवडत. स्वभाव फार बोलका आहे.मित्रांना नेहमी मदत करतो. • गप्पागोष्टी सांगायला आवडतं. भातुकलीच्या खेळात खूप रमते. पझल्स व्यवस्थित जोडता येतात. अभिनय गीत छान करते.
