आमच्या शाळेत बहुसंख्य म्हणजे जवळ जवळ ६० टक्के मुलंमुली ही महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर प्रांतातून आली आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड या प्रांताचे मूळ रहिवासी असणारी ही मुलं. मुंबईशी रस्ता आणि समुद्रमार्गे जवळीक, समुद्रकिनारे आणि निसर्ग यामुळे पर्यटकांची गर्दी याकारणांमुळे अलिबाग काहीच्या काही वाढत आहे. त्यामुळे अर्थात शहर आणि आजूबाजूला होणारी प्रचंड बांधकामं त्यामुळे रोजगाराच्या शोधात मुंबईत येणारे हे इतर प्रांतिय खूप मोठ्या प्रमाणावर अलिबाग आणि जवळच्या खेड्यांमध्ये येऊन राहतात. काहींनी तर इथेच छोटी घरे पण बांधली आहेत.
आमची शाळा ज्या अलिबागजवळच्या कुरूळ गावात आहे तिथेही मोठ्या प्रमाणावर ही सगळी कारागीर मंडळी राहतात. कुणी कुणी गवंडीकाम करणारे, कुणी लादीकाम, कुणी ‘सेंट्रिंग’ची कामं करणारे, कुणी सुतारकाम करणारे… एकाच्या आधारानी दुसरा इथे येतो, दुसऱ्याच्या ओळखीनी तिसरा….! एकमेकांच्या आधारानी इथे राहतात, इथल्या वातावरणात समरस होतात. इथले सण, रितीरिवाज आणि भाषाही आत्मसात करतात. वर्षातून एकदा – बहुदा मे महिन्याच्या सुट्टीत किंवा लग्नकार्याच्या निमित्तानी वर्षातून एकदा ३-४ दिवसांचे प्रवास करून गावाला जाऊन येतात. हातावर पोट असतं,तरीही प्रत्येकाला किमान ३-४ तरी मुलं असतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच पण मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ही इच्छा मात्र असते. इकडे आल्या की त्या बायका एकमेकींना धरून राहतात, अडीअडचणीला एकमेकींना मदत करतात. पण तेवढ्याच आजूबाजूच्या बायकांशी पण मिळून मिसळून राहतात. इकडच्या वातावरणातला मोकळेपणा, बायकांना मिळणारं बोलण्या, वावरण्याचं स्वातंत्र्य त्यांना जाणवतं आणि आवडतं हे त्यांच्या बोलण्यातून नेहमी कळतं. पुरूष दिवसभर कामावर जात असल्यामुळे मुलांना शाळेत आणणं, नेणं, पालकसभेला येणं, फी किंवा इतर काही अडचण असेल तर शाळेत भेटायला येणं हे सगळं या आयाच अतिशय आत्मविश्वासानी करतात.
नव्यानी आमच्या गावात आलेल्या त्यांच्या ‘गावाकडच्या’ मंडळीना ‘ये स्कूल बहोत अच्छा है, मॅडम सब संभाल लेगी’ म्हणून आवर्जून शाळेत घेऊन येणाऱ्या २,३ आयांना तर आम्ही शाळेच्या “Brand ambassador” म्हणतो!
ही मुलं शाळेत येतात तेव्हा बऱ्याचवेळा त्यांना मराठीचा गंधही नसतो. पण वर्गमित्र- मैत्रिणींच्या सहवासात आणि शिक्षकांच्या प्रयत्नांनी ६-७ महिन्यात ती मराठी बोलायला शिकतात… इतकं चांगलं की मराठीत भांडू शकतात. (गेल्यावर्षी आमच्या शाळेत “पूजा विश्वकर्मा” ही विद्यार्थिनी ८६ टक्के गुण मिळवून पहिली आली होती, आणि तिला मराठीत ८९ गुण होते) तर हे सगळं आज सांगण्याचं कारण असं की शाळेचं स्नेहसंमेलन जवळ आलं आहे. चौथीतली मुलं २,३ दिवसांपासून मागे लागली होती – आम्ही नाटक बसवलंय, ते पाहा. आज मुद्दाम वेळ काढून त्यांच्या वर्गात गेले आणि त्यांनी स्वत: बसवलेलं नाटक पाहून मी थक्क झाले. नाटकाला लिखित संहिता नाही. संवाद, दिग्दर्शन, पात्रयोजना सगळं मुलांनीच केलेलं.
नाटकाचं कथानक– एक जण कामाच्या शोधात ‘गावाहून’ आला आहे. इथे त्याला आधीच येऊन इकडे काम करणारे दोघे-तिघे भेटतात. तो त्यांच्याकडे ‘कुठे काम मिळेल का’ अशी चौकशी करतो. हे त्याला एका ठेकेदाराकडे घेऊन जातात. तो त्याला काम देतो.
मग या माणसाला विचार पडतो की ‘राहायचं कुठे?’
हे तिघे म्हणतात,”काळजी करू नकोस, आमच्या बरोबर चल, आपण राहायला जागा शोधू” मग ते त्याला ‘रिक्षानी’ गावात घेऊन येतात. (ही रिक्षा पण एकदम खास… हातात हात गुंफून एक जण पुढे ड्रायव्हर आणि मागे प्रवासी! फोटोत ही रिक्षा आहे.) उतरताना रिक्षावाल्याशी भाड्यावरून घासाघीस पण!
गावात या नव्या माणसाला राहायला जागा मिळवून देतात. तिथेही ‘भाडं जरा कमी करा.. तो नवीनच आलाय’ वगैरे बार्गेनिंग !
त्या खोलीत त्याचं सामान लावून झाल्यावर आता जेवणाचं काय?
“आज तू आमच्याकडे जेवायला ये”. सगळे मिळून मच्छी आणायला गेले. तिथे कोळणीबरोबर पण भावात घासाघीस. एकाला दुकानात पिटाळलं. मच्छी तळायला तेल नी बेसन आणायला. (यांच्याकडे मच्छी बेसन लावून तळतात, हे मला पण आज कळलं ) नंतर सगळे मस्तपैकी जेवले. नवा आलेला माणूस खूष झाला. आणि नाटक संपलं!!
हे सगळं नाटक मुलांनी त्यांच्या मातृभाषेत – “भोजपुरी” मध्ये सादर केलं!!!!!!!!!!!!
(कोणत्याही उत्तम कलाकृतीमध्ये माणसाच्या खऱ्याखुऱ्या जगण्याचं प्रतिबिंब असतं असं काहीतरी ऐकलं, वाचलं आहे)
