भाषांचा पूल बांधताना

“सृजन प्राथमिक विद्यालय”  ही आमची स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळा आणि त्याला जोडून असणारे माध्यमिक विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे.  अलिबाग जवळ साधारण अडीच – तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या  ‘कुरूळ’  गावात आमची शाळा आहे.  अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेच,  तसंच गेल्या १०-१२ वर्षांपासून बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीनेही अलिबागची झपाट्याने वाढ होते आहे.  बांधकाम व्यवसायाशी संबंधित वेगवेगळे व्यवसाय करणारे कारागीर महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या अनेक भागातून अलिबाग आणि परिसरात स्थलांतरित होत आहेत. कुरूळ गावातही अशा कुटुंबांची संख्या मोठी आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कर्नाटक या भागातून येणाऱ्या कुटुंबांची संख्या फार मोठी आहे. त्या कुटुंबामधली बरीच मुलंमुली आमच्या शाळेत येतात.

त्यामुळे आमच्या शाळेत जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थी अमराठी भाषक आहेत.  त्यात  भोजपुरी आणि हिंदी मातृभाषा असणारी मुलंमुली बरीच जास्त आहेत.  सुरुवातीला ही मुलं आमच्या प्राथमिक शाळेत येतात तेव्हा त्यांना मराठीचा गंधही नसतो.  आजूबाजूचं वेगळं वातावरण,  वेगळी भाषा,  वेगळी माणसं यामुळे मुलं अनेकदा बावरलेली असतात.  इथे त्यांचं शिकण्याचं माध्यम मराठी असतं, आजूबाजूची संवादभाषा मराठी असते आणि ती भाषा त्यांना अगदी अनोळखी असते.  त्यामुळे पहिले काही दिवस, एक- दोन महिने ही मुलं बरीचशी अबोल असतात.

आमच्या शिक्षिका या मुलांशी हिंदीत संवाद साधतात.  या मुलांना स्वभाषेत,  त्यांच्या घरच्या संवादभाषेत बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.  सवयीने आमच्या शिक्षिकांना थोडी थोडी भोजपुरी समजते आणि त्यांच्याच वर्गातली किंवा दुसऱ्या वर्गातली मुलं नवीन आलेल्या या मित्र मैत्रिणींसाठी ‘दुभाष्याचं’ काम मोठ्या आनंदानी करतात.  शिक्षिका वर्गातल्या प्रत्येक कृतीत त्यांना सहभागी करून घेतात. मुलांची मातृभाषा आणि शिक्षणभाषा असणारी मराठी यात पूल बांधण्यासाठी चित्रवाचनाचा फार चांगला उपयोग होतो. मुलंच एखादं चित्र काढतात आणि त्याला हिंदी, मराठी, भोजपुरी, कानडी, बंगाली यासारख्या भाषांत काय म्हणतात ते सांगतात. शिक्षिका ( देवनागरीत ) ते फळ्यावर लिहितात, पुढे पुढे मुलं वर्गातल्या तळफळ्यांवर (ज्यांना आम्ही ‘ बोलफलक ‘ म्हणतो) स्वत:च हे काम करतात.

या सगळ्या प्रक्रियेत खूप मोलाची आणि महत्वाची असते ती वर्गातल्या मुलांची आपापसातली आंतरक्रिया,  त्यांचा एकमेकांशी संवाद!  वर्गात आधीपासून असलेली अमराठी मुलं नवीन आलेल्या  इतर भाषक ( आम्ही कधीच ‘परप्रांतीय’ हा शब्द वापरत नाही ) मुलांसाठी दुभाष्याचं काम अतिशय उत्तम रीतीने करतात. शिक्षिकेला जे म्हणायचंय ते त्या मुली/मुलापर्यंत  किंवा त्यांना जे म्हणायचंय ते बाईंपर्यंत पोहोचवण्याचं काम वर्ग मित्रमैत्रिणी अगदी छान पार पाडतात.  त्यामुळे ही मुलं मराठी अगदी पटकन आत्मसात करतात.

वर्गातल्या गप्पागोष्टींमध्ये, चर्चेत शिक्षिका या मुलांना बोलायला प्रोत्साहन देतात. त्यांच्या मातृभाषेतले शब्द स्वीकाराले जातात. सुरुवातीच्या काळात तर त्यांच्या कोणत्याच बोलण्याला चुकीचं, अशुद्ध ठरवलं जात नाही.  त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो.  चर्चा, संवाद, अनुभवलेखन व कथन यासाठी चित्रे, कात्रणे, तक्ते, चित्रवाचन कार्डे, पुस्तके, शाळेतील विविध उपक्रम यांचा कल्पकतेने वापर करून शिक्षिका जाणीवपूर्वक वातावरणनिर्मिती करून नवी भाषा शिकण्याची संधी निर्माण करतात.

या वर्षी जून महिन्यात चौथीच्या वर्गात ‘खुशी रैदास’ ही विद्यार्थिनी नवीन आली. तिचे वडील तिला घेऊन आले आणि वर्गशिक्षिकेला सांगून गेले, ” मॅडमजी, हम गाव मे से इसे लेके आये! आप अडमिसन करा दो. इसे मराठी कुछ समझ नही आता! हम भोजपुरी है ! खुशीचा शिकण्याचा प्रवास सांगताना तिची शिक्षिका मानसी सांगते, “खुशीला मी हिंदीतून काही प्रश्न विचारले पण तिने उत्तरं दिली नाहीत, आली तेव्हा ती खूप लाजरी होती, कोणाशी बोलायची नाही. खेळायची नाही. पण चार – पाच दिवसांनी वर्गातल्या समभाषिक मुलींशी तिची मैत्री झाली. मी तिच्याशी बोलू लागले तिला बोलतं केलं. तिच्या भाषेतले शब्द विचारले, मराठी मधले त्याला समानार्थी शब्द सांगितले. असं करत आमचं संभाषण वाढलं. आता तीनचार महिन्यानंतर खुशी मराठी पण बरंच चांगली बोलायला लागलीय. एखादा शिकवलेला भाग समजला नाही तर “बाई, परत शिकवशील? ” असं न लाजता विचारते.

तीन – चार वर्षांपूर्वी शाळेत तिसऱ्या इयत्तेत आलेली सुप्रिया सिंग सुरुवातीला मराठी शिकायला, बोलायला अजिबात तयार नव्हती. “मै नही बोलुंगी मराठी, हमरी भाषा हम भूल जावेंगे “! असं ती ठणकावून सांगायची. तिच्या वर्गशिक्षिकेनेही संयम ठेवला. शाळेतही समभाषिक मित्रमैत्रिणींबरोबर ती भोजपुरीतून बोलू शकणार आहेच हा विश्वास दिला. सुप्रिया यावर्षी चौथीत आहे. छान मराठी बोलते. स्वत:ची भाषा अजिबात विसरली नाहीये, उलट भोजपुरीतही सफाईदारपणे लिहिते. मागच्याच महिन्यात तिने तिच्या शिक्षिकांबद्दल लिहिलं होतं –
“हमार मॅडम हई मानसी और विनिता. उ हमके बहुत अच्चि बाई हई. उ हमके बोलेली नाही, और हमके पढाएली. उनकर विषय ह – मराठी और विनिता बाईके विषय ह परिसर भाग दू (२). उ हमार सबसे अच्छे बाई हई. उ हमके दुलार देली. और सबसे मोठी बाई के नाव ह सुजाता. उ अमनीके गोवींदा के दिन आवेलातब उ बोलेली की गोविंदा फोडेके देली. और उ सबसे इसकुलके बडी मोठी बाई हइ. और उ दावी (दहावी ) मे पढाएली.  उ हमनी के सबसे अच्ची बाइ हई. और उ बोलेली बहुत पढाई करेके. तबेतर बहुत पढाई आई.”

शिकण्याची भाषा म्हणून या इतर भाषक मुलांना मराठी तर शिकायला हवीच पण त्यांनी त्यांची मातृभाषा विसरू नये किंवा तिच्याबद्दल त्यांना न्यूनगंड वाटू नये असं आम्हाला मनापासून वाटतं. उलट त्यांना एक भाषा जास्त बोलता, लिहिता येते त्याचा आनंद घेता यावा असा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच ही मुलं जेव्हा अशी स्वत: होऊन त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होतात तेव्हा खरंच मनापासून आनंद वाटतो! पुढच्या इयत्तांमध्ये या इतरभाषक मुलांना मराठी उत्तम बोलता येतं. लेखन सफाईदारपणे, प्रमाण मराठीचे नियम पाळून जमण्यासाठी मात्र बरेच प्रयत्न करावे लागतात, त्यात अजून तरी आम्हाला शंभर टक्के यश मिळालेलं नाही. पण त्यातही काही उदाहरणं अतिशय आशादायक आहेत. तीन वर्षांपूर्वी पूजा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीत ८२ टक्के गुण मिळवले आणि मराठी प्रथम भाषेत तिला ८९ गुण होते. हे एक ठळक अभिमानास्पद उदाहरण!

रोजीरोटी मिळवण्यासाठी भारतभरात मोठ्या प्रमाणावर कामगारांचे, कारागिरांचे स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रात तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोट भरण्यासाठी येत असतात. अश्या पालकांच्या मुलांचे शिक्षण हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पालकांचा अशिक्षितपणा, दारिद्र्य, शिक्षणाबद्दलची अनास्था यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत असतोच परंतू भाषिक अडसर हा सुद्धा मोठा अडथळा असतो. अश्यावेळी या विद्यार्थ्यांना  शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची भाषा स्वीकारली पाहिजे, भाषेबरोबरच त्यांची संस्कृती, चालीरीती, सणवार याबद्दलही आस्था दाखवली गेली पाहिजे त्यांची मातृभाषा आणि शिक्षणाचे माध्यम असलेली भाषा यात समन्वय साधला गेला पाहिजे. तरच ही मुले आनंदाने शिकू शकतील आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. हे फार मोठं आव्हान आहे पण मराठी शाळाच ते आव्हान पेलू शकतील याची मला खात्री आहे!

म्हणूनच अन्य भाषक विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थाला स्वत:च्या भाषेत बोलण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. हीच भाषा बोलणारी यापूर्वीची जी मुले असतात त्यांचाशी परस्पर संवाद साधण्याची संधी दिली जाते. त्यांच्या अनुभव विश्वाशी निगडीत चित्र काढून चर्चा घडवली पाहिजे. हि चर्चा होत असताना शिक्षकाने दोन्ही -तिन्ही भाषांमधले समानार्थी शब्द वापरले पाहिजेत. त्या विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतील शब्द स्वीकारून मराठी भाषेतील पर्यायी शब्द त्यांना सांगितले पाहिजेत. या संवादासाठी विविध वस्तू, भरपूर चित्र आणि वर्गात जाणीव पूर्वक निर्माण केलेल्या शिकण्याच्या संधी अत्यंत गरज आहे. ह्या सर्व प्रक्रियेत कुठेही मूल अशुद्ध चुकीचे बोलते आहे असे म्हटले जाऊ नये. “मुलांच्या भाषेचा स्वीकार करणे आणि संवादाला प्रोत्साहन देणे” हि या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

“बहुभाषिक वर्ग”या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आणि शिकण्याबद्दल गोडी निर्माण होते. भाषेच्या भिन्नत्वामुळे सुरुवातीला लाजरे-बुजरे असणारे मूल मनमोकळेपणाने बोलू लागते. या अन्य भाषक मुलांची शैक्षणिक संपादणूक आतिशय उत्तम असते असे आढळून आले तसेच वर्गातल्या, शाळेतल्या मराठी भाषिक मुलानाही इतर भाषांबद्दल कुतूहल निर्माण होते. मुले इतर भाषा शिकण्यास प्रवृत्त होतात आपल्या भाषा भगिनींबद्दल विद्यार्थांच्या मनात आदर निर्माण होतो. इतर भाषिक अन्य प्रांतीय यांच्या बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात दुजाभाव राहत नाही. एकतेची भावना निर्माण होते.

या उपक्रमासाठी विद्यार्थांनी स्वतः काढलेली चित्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे, नाट्यीकरण, शाळेतील विविध उपक्रम, गोष्टींची पुस्तके, चित्रावचन कार्डे, तक्ते इत्यादी साधनांची गरज असते. तसेच शाळेत व परिसरात उपलब्ध असलेल्या साधनांचा शिक्षकाने कल्पकतेने वापर केल्यास या उपक्रमासाठी वेगळा कोणताही खर्च करावा लागत नाही.