शाळेचा पहिला दिवस

जून महिन्यात शाळा सुरू झाली की सगळ्या शाळेला उत्सुकता असते ती बालवर्गात नवीन प्रवेश घेऊन येणाऱ्या चिमुरड्यांची.  नवी खेळणी,  पुस्तकं,  रंगीत खडू,  फाडकामासाठी कागद,  बालवर्गाच्या बाईंनी बोलफलकावर काढलेली चित्रं,  वर्गात लावलेले फुगे,  चॉकलेटं या साऱ्यासह सगळी शाळा या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी सज्ज असते.  बहुतेक मंडळी प्रवेशाच्या वेळी आईचं बोट धरून एकदा शाळेत येऊन गेलेली असतात.  तर काहीजण त्याच दिवशी पहिल्यांदा शाळेत येतात.  नवा गणवेश,  नवं दप्तर ( ते हवंच असतं, सुरूवातीला त्यात फक्त डबा आणि एखादी पाटी, वही असते. मग हळूहळू त्यात ताई / दादाच्या जुन्या वह्या,  चित्रांची पुस्तकं,  एखादं लहानसं खेळणं,  मणी,  काचा असं काहीही यायला लागतं. )

प्रत्येक नव्या मेंबरची एंट्री वेगवेगळ्या पध्दतीनी होते.  कोणी आईचा हात धरून एकदम ऐटीत येतं आणि जसं काही जन्मल्यापासूनच ही शाळा,  वर्ग,  बाई ‘आपुनको मालूम है’ अश्या थाटात पहिल्याच दिवशी बिनधास्त बसतात, खेळणी खेळतात, रद्दी  पेपर फाडतात, शाळेत पहिल्या दिवशी खास केलेला साखरभात आवडीनी खातात आणि आरामात घरी जातात.  काही मंडळी घरून येताना जरा ताशा वाजंत्री लावून येतात पण शाळेत आलं की तिथली गंमत जंमत पाहून थोड्या वेळानी रमतात.  काही जण घरून छान नॉर्मल मूडमधे येतात आणि शाळेत आलं की आता आई आपल्याला इथे सोडून जायची शक्यता आहे असं वाटलं की तारस्वरात भोकाड पसरतात.  अशा मुलांच्या आयांनाही अनेकदा आठ दहा दिवस बालवर्गात प्रवेश घ्यावा लागतो.  त्यातली काही पिल्लं आई डोळ्यासमोर असली की छान खेळतात, वर्गात बागडतात मग हळूहळू रूळतात आणि आई शाळेत सोडून जायला लागली की टाटा करायचा धीर पण येतो त्यांना. काही वीर मात्र आईच्या मांडीवरून उतरायलाच तयार नसतात.

वर्गात काय चाललंय, बाकीचे वर्ग बंधूभगिनी काय करतात याचं ते आईच्या मांडीवर बसूनच तटस्थपणे अवलोकन करत असतात. अशा मंडळींच्या आया आठेक दिवस बसून कंटाळतात आणि मग बाईंच्या ताब्यात सोपवून पटकन सटकतात. मग बिचारी चिमुरडी डोळ्यात पाणी, नाकात शेंबूड अश्या अवतारात बाईंच्या मांडीवर बसून ” आई … मम्मी … अम्मी ” असा जप करत शाळा सुटायची वाट पाहात राहतात. पंधराएक दिवसात सगळं स्थिरस्थावर होतं, आणि ही भोकाड पसरणारी चिंटीपिंटीच दादा, ताईगिरी करायला लागतात. इकडे तिकडे धावून बाईंना सतावतात. एकमेकांशी मैत्री होते, भांडणं पण होतात. खेळणी, खडू, फळा, रंगीत खडू सगळं सगळ्यांनी मिळून वापरायचं असतं हे कळायला लागतं. धांगडधिंगा नाचायसाठी बाईंच्या मोबाईल मधे गाणी लावायची फर्मानं निघतात. शाळेतली खिचडी आवडायला लागते.

वडाच्या झाडाच्या पारंब्यांवर झोके घेण्यातली, पावसात भिजण्याची, कागदी बोटी करून सोडण्यातली मज्जा कळायला लागते. गाणीगोष्टी पाठ होतात. थोडी थोडी अंक अक्षर व्हायला लागते. बोलफलकावर, फरशीवर स्वत:काढलेली अक्षरं, चित्रं दाखवण्यातला अभिमान तर फार सॉलिड असतो. आणि मग आईबाबा न्यायला आले तरी कधीकधी घरी जायची तयारी नसते. काही मंडळी घरी जायचं नाही म्हणून रडायला लागतात. आजारी असलं तरी शाळेत येणं हवं असतं. प्रेमळ, जीव लावणाऱ्या बाईंकडून हक्कानी हट्ट पुरवून घेतले जातात. घरातली प्रत्येक गोष्ट शाळेपर्यंत पोचते. कोणाकडे पाहुणे आले, आईनी जेवायला काय केलं, नवीन वस्तूची खरेदी, कुठे बाहेर, फिरायला गेलं असेल त्याचा साद्यंत रिपोर्ट मिळत असतो. ३-४ वर्षांच्या या मुलांच्या घरी याच काळात बहुदा दुसरं नवं बाळ येतं . मग ते बाळ काय काय करतं याच्या गोड वर्णनासह बाळ बघायला येण्याचा लाघवी आग्रह पण असतोच.

नवा ड्रेस, नवी वही, कानातले, बांगड्या, खेळणं, पुस्तकं हे शाळेत आणून दाखवणं तर जसं काही compulsory च असतं. त्याला नुस्तं छान म्हणून चालत नाही .. ते  कोणी, कसं, कधी आणलं याचा साद्यंत वृत्तांत ऐकायला लागतो. काही काही चिमुरडी अजूनही थोडी बोबडी बोलत असतात. त्यामुळे काय सांगतात ते आपल्याला सगळं एका फटक्यात कळणं कठीणच असतं खरंतर, पण लक्षपूर्वक ऐकावं लागतंच!
सतत चालणारे, बोलणारे, उड्या मारणारे, कोणत्याही क्षणी आपल्या ध्यानीमनी नसेल असा काहीही उपद्व्याप करणारे, असंख्य प्रश्न विचारणारे २५-३० चिमुकले जीव तीन तास सांभाळणं, तेही अतिशय प्रेमानी ही सोप्पी गोष्ट नसते. आमच्या शाळेतल्या अर्चना कुंटे आणि संध्या थळकर या दोघी सहकारी मैत्रिणी फार मन लावून, झोकून देऊन हे काम करतात. त्यांना वर्गात पाहिलं की लेकुरवाळ्या विठूची आठवण येते मला!

मी शाळेच्या कामात कितीही बिझी असले तरी बालवर्गात एक चक्कर मारल्याशिवाय मला करमतच नाही. मी दारातच असते तेव्हाच सगळी फौज धावत येते नी बाई, बाई करत पायाला मिठी मारतात. ग्राउंडवर खेळत असली तरी पळत पळत येणार आणि पायाला मिठी.  हात धरून त्यांची चित्रं, खेळ दाखवायला नेतात, कोणी हात ओढत असतं, कोणी पदर, ओढणी ओढत असतं, प्रत्येकाला जवळ घेऊन लाड करायला हवे असतात. त्या वेळचा त्यांच्या डोळ्यातला आनंद खरंच अवर्णनीय असतो. माझ्याही मनातले ताण, चिंता त्या कोवळ्या हातांच्या मिठीत विरघळून जातात. अनेक वेळा मोबाईल मधे त्यांचे, त्यांच्या चित्रांचे फोटो काढायची ऑर्डर दिली जाते. हां, अगदी ओर्डरच असते ती ” फोटो काढा आमचा “! आणि क्लिक झाल्या झाल्या ” दाखवा “!! ( मागे हिंदी मातृभाषा असलेली २-४ मुलंमुली दाखवाच्या ऐवजी ” बगवा” म्हणायची. ते तर फार गोड वाटायचं. )

असं खेळत बागडत वर्षं पटकन संपून जातं. ताईदादांना असते तशी कागदावरची परीक्षा पण हवी असते. मग त्यांच्या बाई काहीतरी गंमतजंमत पेपर काढतात. तो पेपर पण कौतुकानी मिरवला जातो. आणि मग एक मे ला रंगीत प्रगतीपुस्तक पण मिळतं बरं का! वर्षभर जीव लावलेल्या त्या चिमुरड्यांच्या प्रगतीच्या नोंदी वाचणं फार छान असतं. त्यांच्या फुलण्याचा प्रवास असतो तो. माणूस पणाची बीजं त्यांच्यात रूजत असल्याच्या त्या नोंदी असतात. अर्चना आणि संध्या या माझ्या सहकारी मैत्रिणी ते प्रत्येक मूल समजून घेऊन ज्या संवेदनशीलतेनी त्याच्या नोंदी ठेवतात त्याचं मला फार कौतुक वाटतं.

ते एकेक नोंदपत्रक म्हणजे प्रत्येक मुलामुलीच्या चिमुकल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. त्यातल्या या काही प्रातिनिधिक नोंदी. त्या वाचून मला वाटलं, प्रत्येक लहान मूल किती निरागस, सहृदय असतं, उत्साही आणि सहकारी वृत्ती जोपासणार असतं. त्यांचीच मोठी माणसं झाल्यावर काय बिनसत असावं बुवा?
• सतत काहीतरी लिहिण्याची आवड आहे. सर्वांशी मैत्री करायला आवडते. स्मरणशक्ती चांगली आहे. गोष्टींचे नाट्यीकरण करायला आवडते.
• स्वभाव गोड आहे. वर्गातल्या मुलामुलींशी मैत्री करायला आवडतं. शैक्षणिक साहित्याचा वापर छान करते. नाचायला, गोष्ट सांगायला फार आवडतं.
• हातापायाचे ठसे काढायला आवडतं. गटकार्यात सहभागी असते. गोष्ट ऐकायला शांत बसते. नेहमी हसत असते.
• मनमिळावू स्वभाव आहे. दुसऱ्याला मदत करायला आवडत. नाचायला, उड्या मारायला खूप आवडतं.
• सारखं रागवायला आवडतं. स्वभाव हळवा आहे. हट्टीपणा करतो पण भांडणं झालं तरी परत  मैत्री करायला जवळ जातो.
• स्वभाव बोलका आहे. सर्वांशी मैत्री करते. गाण्यामधे भाग घेते. नवीन शिकण्याची आवड आहे.
• गप्पा मारायला फार आवडतात. वस्तू गोळा करायला आवडतं. नाचणे, गाणे, वाजवणे आवडत. स्वभाव फार बोलका आहे.मित्रांना नेहमी मदत करतो.
• गप्पागोष्टी सांगायला आवडतं. भातुकलीच्या खेळात खूप रमते. पझल्स व्यवस्थित जोडता येतात. अभिनय गीत छान करते.